प्रामाणिकपणाची अनोखी झलक!
रस्त्यात सापडलेला महागडा मोबाईल सामाजिक कार्यकर्ते विल्सन मोखाडे यांनी केला परत
मोबाईल वर्धा जिल्ह्यातील नामवंत उद्योजक प्रदीप बजाज यांचा असल्याचे निष्पन्न
प्रदीप बजाज यांनी विल्सन मोखाडे यांचा केला सत्कार

Screenshot
वर्धा, प्रतिनिधी :
येथील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते तथा एका साप्ताहिक वृत्तपत्राचे मुख्य संपादक विल्सन मोखाडे यांनी रस्त्यात सापडलेला सुमारे ४७ हजार रुपये किमतीचा वन प्लस कंपनीचा महागडा स्मार्टफोन कोणताही मोह न बाळगता त्याच्या मूळ मालकाच्या स्वाधीन करून प्रामाणिकपणाचे उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. त्यांच्या या कृत्यामुळे मोबाईल हरवलेल्या व्यक्तीला मोठा दिलासा मिळाला असून शहरात या प्रामाणिकपणाची जोरदार चर्चा रंगली आहे.
सविस्तर वृत्त असे की, गुरुवार दि. ४ जून रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास सेवाग्राम मार्गाने जात असताना विल्सन मोखाडे यांना जिल्हा न्यायालयासमोरील रस्त्याच्या मध्यभागी एक मोबाईल फोन पडलेला आढळला. त्यांनी तत्काळ तो मोबाईल उचलून वर्धा शहर पोलीस ठाण्यात जमा केला व तेथील कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना संपूर्ण माहिती दिली.
दरम्यान, पोलीसांनी सापडलेल्या मोबाईलवरून संपर्क साधून संबंधित मालकाला आवश्यक कागदपत्रांसह पोलीस ठाण्यात बोलावले. काही वेळातच वर्धा जिल्ह्यातील नामवंत उद्योजक प्रदीप बजाज यांनी पोलीस ठाण्यात हजेरी लावून सदर मोबाईल आपलाच असल्याचे सांगितले. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर पोलीसांनी मोबाईल त्यांच्याकडे सुपूर्द केला.
आपला महागडा मोबाईल आणि त्यातील महत्त्वपूर्ण माहिती (डेटा) सुरक्षितपणे परत मिळाल्याने प्रदीप बजाज यांनी विल्सन मोखाडे यांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.
आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात हरविलेली मौल्यवान वस्तू परत मिळणे दुर्मिळ झाले आहे. अशा परिस्थितीत विल्सन मोखाडे यांनी दाखविलेला प्रामाणिकपणा आणि माणुसकी समाजासाठी प्रेरणादायी ठरली आहे. त्यांनी वस्तू परत करून सामाजिक जबाबदारीचे भान आणि मानवतेचे दर्शन घडविले आहे.
या घटनेतून प्रामाणिकपणा आणि माणुसकी आजही समाजात जिवंत असल्याची प्रचिती आली. तसेच प्रामाणिक व्यक्तींच्या पाठीशी समाज नेहमीच उभा राहतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. या प्रसंगी उपस्थित पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनीही विल्सन मोखाडे यांच्या या कार्याचे कौतुक केले.
त्यांच्या या प्रामाणिक कार्यामुळे आणि सद्गुणी वृत्तीमुळे सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून समाजात त्यांच्या कार्याबद्दल आदर व्यक्त केला जात आहे.














Leave a Reply