दारू पकडली… पोलिसांना मंत्र्यांना फोन लावण्याची धमकी;
राज्यमंत्री भोयर यांच्या नावाचा गैरवापर सुरू?

वर्धा | प्रतिनिधी – मंगेश चोरे पाटील.
वर्धा शहरातील रामनगर पोलीस ठाणे परिसर हा मागील काही दिवसांपासून विविध कारणांनी चर्चेत होता. परिसरात खुलेआम अवैध दारू विक्री, वाहतूक आणि इतर बेकायदेशीर धंदे सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचत होत्या. नागरिकांमध्ये वाढता रोष, वारंवार होणाऱ्या तक्रारी आणि कायदा-सुव्यवस्थेबाबत निर्माण होत असलेल्या प्रश्नांमुळे अखेर पोलीस अधीक्षकांनी कठोर भूमिका घेत तडकाफडकी कारवाई केली. यानंतर येथील ठाणेदारांची बदली करण्यात आली आणि नव्याने महिला अधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपविण्यात आली.
नवीन ठाणेदारांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच काही दिवसांत अवैध धंद्यांवर कठोर कारवाईचा सपाटा सुरू केला. पोलीस कारवाईचे परिणामही दिसू लागले. अनेक ठिकाणी तपासणी मोहीम राबवण्यात आली, संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले आणि परिसरातील अवैध धंद्यांना आळा बसविण्याचा प्रयत्न सुरू झाला.
याच कारवाईदरम्यान दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली. परंतु विशेष बाब म्हणजे कारवाई सुरू असताना संबंधित व्यक्ती अचानक आक्रमक झाली. पोलिसांवरच दबाव आणण्याचा प्रयत्न करत त्याने थेट खिशातून मोबाईल बाहेर काढला आणि मोठ्या आत्मविश्वासात “थांबा… आता राज्यमंत्री पंकज भाऊंना फोन लावतो,” असे बोलल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
हे वाक्य उच्चारल्यानंतर काही क्षण परिसरात शांतता पसरल्याचे सांगितले जाते. कारण एकीकडे पोलीस आपले काम करत होते, तर दुसरीकडे एका आरोपीकडून थेट मंत्र्यांचे नाव घेत दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचे दृश्य उपस्थितांनी पाहिले.
आता यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित व्यक्ती खरोखरच राज्यमंत्री पंकज भोयर यांची ओळख सांगत होती का? ती त्यांची जवळची व्यक्ती होती का? की केवळ स्वतःला वाचविण्यासाठी आणि पोलिसांवर मानसिक दबाव निर्माण करण्यासाठी मंत्र्यांचे नाव वापरण्यात आले? हा प्रश्न आता चर्चेचा विषय ठरत आहे.
प्रत्यक्षात मंत्री आणि अशा अवैध धंदे करणाऱ्या लोकांचा संबंध असल्याचे कोणतेही पुरावे समोर नाहीत. उलट राज्यमंत्री पंकज भोयर हे विकासकामे आणि राजकीय कार्यासाठी ओळखले जातात. मात्र काही स्वयंघोषित कार्यकर्ते, स्थानिक चमचे किंवा स्वतःला जवळचे समजणारी मंडळी मंत्र्यांच्या नावाचा वापर करून स्वतःचा प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे.
विशेष म्हणजे हा पहिलाच प्रकार नसल्याचेही बोलले जात आहे. यापूर्वी सेलू परिसरात देखील काही व्यक्तींनी “आम्ही मंत्र्यांचे माणूस” सांगत स्वतःची वेगळी सत्ता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा रंगली होती. राजकीय शिफारशीवर एखाद्या अधिकाऱ्याची बदली होणे ही नवी बाब नाही. लोकप्रतिनिधी शिफारस करतात, हा लोकशाही व्यवस्थेतील भाग आहे. मात्र काही जण त्या शिफारशीच्या जोरावर स्वतःला कायद्यापेक्षा वर समजू लागतात, ही चिंतेची बाब आहे.
शहरात सध्या आणखी एक चर्चा रंगताना दिसत आहे. काही अवैध व्यवसाय करणारे, तस्करी करणारे किंवा बेकायदेशीर धंदे करणारे लोक खुलेआम मोठ्या नेत्यांचे नाव घेत असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जाते. सामान्य नागरिक अशा घटनांकडे पाहून संभ्रमात पडतो. कारण जर प्रत्येक जण स्वतःला एखाद्या मंत्र्याचा माणूस म्हणू लागला, तर प्रशासन आणि कायद्याविषयी जनतेचा विश्वास कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आज प्रश्न एवढाच आहे की, मंत्री महोदयांच्या नावाचा वापर कोण करत आहे? आणि तो का करत आहे? कारण राजकीय नेत्यांची खरी प्रतिमा त्यांच्या कामावर तयार होते; मात्र त्यांच्या नावाचा गैरवापर करणारे काही लोक त्याच प्रतिमेला धक्का पोहोचवतात.
लोकशाहीत निवडणूक प्रचार महत्त्वाचा असतोच, पण त्याहून महत्त्वाचा असतो तो लोकांच्या तोंडचा प्रचार. जनतेत निर्माण होणारी प्रतिमा, चर्चा आणि विश्वास हीच नेत्यांची खरी ताकद असते. त्यामुळे राज्यमंत्री भोयर यांनी आपल्या नावाचा गैरवापर करणाऱ्या तथाकथित समर्थकांवर वेळीच लगाम लावण्याची गरज असल्याचे मत आता नागरिकांमधून व्यक्त होत आहे
(टीप : वरील मजकूर स्थानिक चर्चांवर आधारित असून संबंधित पक्षाची अधिकृत बाजू समोर आल्यानंतर त्यासही स्थान देण्यात येईल.)













Leave a Reply