महिला आश्रम येथील पंप बंद पडणार?
तेल कंपनीकडून चौकशी सुरू…
वर्धा (मंगेश चोरे पाटील): वर्धा शहरातील महिला आश्रम परिसरातील राजपाल यांच्या पेट्रोल पंपावर भेसळ केली जात असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती. मात्र अलीकडेच भेसळ करण्यासाठी आणलेले पेट्रोल-डिझेल पकडण्यात आल्याने या चर्चेला अधिक बळ मिळाले आहे. या घटनेमुळे नागरिकांचा या पंपावरील विश्वास उडाला असून अनेक वाहनधारकांनी येथे पेट्रोल-डिझेल भरणे बंद केले आहे.
दरम्यान, वर्धा पोलिसांनी राजपाल याला अटक करून कारवाई केल्याने या प्रकरणातील भेसळीचा प्रकार उघडकीस आला आहे. सध्या राजपाल यांच्या पेट्रोल पंपात भेसळ होत असल्याची लेखी तक्रार तेल कंपनीकडे करण्यात आली आहे. या तक्रारीची दखल घेत कंपनीकडून पंपाची सखोल चौकशी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
माहितीनुसार, चौकशीत आरोप सिद्ध झाल्यास संबंधित पेट्रोल पंप सील करण्याची कारवाईही होऊ शकते. तसेच पंपावर ग्राहकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नाहीत, ग्राहकांची दिशाभूल करून कमी पेट्रोल-डिझेल दिले जाते, तसेच मशीनमध्ये तांत्रिक फेरफार करून विक्री केली जाते, असेही आरोप करण्यात येत आहेत.
राजपाल यांच्या पंपावर चोरीचे पेट्रोल-डिझेल पकडण्यात आल्यापासून अनेक वाहनधारकांनी या पंपाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे लवकरच तेल कंपनीकडून या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.














Leave a Reply