राजपाल पेट्रोल पंपावर घातक हालचाली?
डस्टर वाहनात देशी कट्टे आणि तलवारी; नागपूरच्या काही गुंडांचा गुन्हा करण्याचा प्रयत्न?

वर्धा (मंगेश चोरे पाटील) वर्धा पोलिस यंत्रणेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कापडे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंदे चालवणारा गिरीश राजपाल आणि त्याची टोळी पुन्हा सक्रिय झाल्याची माहिती समोर येत आहे. गोपनीय सूत्रांच्या माहितीनुसार, काल एका रेनॉल्ट डस्टर वाहनातून चार देशी कट्टे आणि काही तलवारी आणण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
दोन दिवसांपूर्वी वर्धा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका वाहनात काही अनोळखी व्यक्तींची बैठक झाल्याचेही समजते. त्यानंतर एक एनोव्हा कार नागपूरकडे रवाना झाली. नागपूरहून आलेले हे लोक नेमके कोण होते, याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी या हालचालींमुळे एखाद्या मोठ्या गुन्ह्याची चाहूल लागत असल्याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, जवळपास वीस वर्षांनंतर पोलिसांच्या हाती लागलेल्या माहितीनुसार गिरीश राजपाल हा पेट्रोल-डिझेल तस्करीत सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, डिझेल-पेट्रोल तस्करी व्यतिरिक्त त्याचे इतरही अनेक अवैध धंदे असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कोरोना काळात दारू विक्रीत सहभागी असलेल्या गिरीश राजपालने नकली दारू तयार करण्याचा फॉर्म्युला आणल्याचीही चर्चा आहे. एका लिटर केमिकलमध्ये काही रसायने मिसळून ते ७५ लिटर पाण्यात टाकल्यास नकली व विषारी दारू तयार होते, असा दावा केला जात आहे. हा फॉर्म्युला सध्या जिल्ह्यातील काही तस्करांना विकला जात असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.
हे केमिकल नेमके कोठून येते याची अधिकृत पुष्टी झालेली नसली, तरी नागपूरमधील वाडी परिसरातून ते येत असल्याची माहिती समोर येत आहे. या व्यवहारात मोठ्या गटाचा सहभाग असून आलेला माल पुलगाव रोडवरील एका शेतात साठवून तेथून पुढे पुरवठा केला जात असल्याचे सांगितले जाते.
सदर केमिकल अत्यंत महागडे असून ते मानवी आरोग्यास घातक असल्याचेही बोलले जात आहे. पुढील काही दिवसांत या संपूर्ण प्रकरणाचा अधिक खुलासा होण्याची शक्यता असून डिझेल तस्करीसोबतच दारू तस्करीचाही पर्दाफाश होऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, २०० लिटर नकली दारू तयार करण्याची एक किट सुमारे ७० हजार रुपयांना विकली जात होती. दररोज अशा सुमारे १० किट जिल्ह्यातील विविध भागात विकल्या जात असल्याची चर्चा आहे. यामुळे दररोज सुमारे सात लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक उलाढाल होत असल्याचा अंदाज आहे.
पोलिसांनी डिझेल-पेट्रोल तस्करीवर कारवाई केल्यापासून हा धंदा काही काळ थांबला असला तरी नागपूरमध्ये अद्याप काही बैठका सुरू असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे हा माल वाहतूक करताना कारमध्ये फक्त एक महिला बसलेली असते, त्यामुळे पोलिसांना संशय येत नाही, असेही सूत्रांनी सांगितले.
मात्र या सर्व प्रकाराचा लवकरच भांडाफोड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
क्रमशः…














Leave a Reply