रेती घाटातील हत्याकांडाचा तपास गुप्तचर यंत्रणेकडे?
मुख्य सूत्रधार कोण, याबाबत उत्सुकता

वर्धा (प्रतिनिधी) वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे घडलेल्या भारत नागपाल यांच्या हत्याकांडाने संपूर्ण रेतीघाट परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर रेती व्यवसायाशी संबंधित अनेक चालक व व्यापारी धास्तावले आहेत.
घटना घडल्यानंतर आरोपींची ओळख समोर आली असली, तरी ही घटना नेमकी कोणत्या कारणातून घडली आणि यामागे कोणाचा सूत्रधार आहे का, याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, सावंगी घाटासंदर्भात काही आर्थिक वाद निर्माण झाले होते. संबंधित घाटाच्या व्यवहारात काही व्यक्तींनी गुंतवणूक केल्याची चर्चा असून, त्यावरून वाद झाल्याचे समजते.
मृतक भारत नागपाल यांनी काही अनियमित व्यवहारांबाबत आक्षेप घेतल्याचेही बोलले जात आहे. मात्र या सर्व बाबींची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. पोलिसांकडून प्राथमिक तपास सुरू असून, पुढील तपास गुप्तचर विभागाकडे सोपविला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, औद्योगिक परिसरातील मुरूम चोरी, अनधिकृत साठेबाजी किंवा इतर आर्थिक गैरव्यवहारांबाबत काही नावांची चर्चा होत असली तरी अधिकृतरीत्या कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
या संपूर्ण प्रकरणातील सत्य परिस्थिती तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
(क्रमशः)














Leave a Reply