Advertisement

पोलिस अधीक्षकांच्या दणक्याने डिझेल-पेट्रोलचे अवैध धंदे बंद

समाचार शेयर करें

पोलिस अधीक्षकांच्या दणक्याने डिझेल-पेट्रोलचे अवैध धंदे बंद

केळझरातून तस्कर गायब, पोलिसांची विशेष टीम तैनात

वर्धा (मंगेश चोरे पाटील):
जिल्ह्यात सुरू असलेल्या डिझेल-पेट्रोल तस्करी व लोखंडी सलाख चोरीच्या अवैध धंद्यांना अखेर चाप बसला असून, पोलिस अधीक्षक श्री. सौरभ अग्रवाल यांच्या कठोर कारवाईमुळे हे धंदे बंद झाल्याचे चित्र आहे. केळझर परिसरातून तस्कर अचानक गायब झाले असून, परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष टीम तैनात करण्यात आली आहे.

माहितीनुसार, केळझर येथील रवी चोरे याच्या धाब्यावर खुलेआम चोरीचे लोखंड तसेच डिझेल-पेट्रोलची तस्करी सुरू होती. सलाऊ नावाचा लोखंड तस्कर सक्रिय असून, दररोज हजारो लिटर डिझेल-पेट्रोलची बेकायदेशीर वाहतूक केली जात होती. सावंगी परिसरात दिलदार नावाच्या तस्कराचा पर्दाफाश झाल्यानंतर पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणाकडे विशेष लक्ष दिले. त्यानंतर हेच तस्कर केळझर परिसरात अधिक सक्रिय झाल्याचे उघड झाले.

दहेगाव रस्त्यालगतच्या पुलाखाली पेट्रोल-डिझेल काढून त्याचा साठा केळझर येथील धाब्यावर केला जात असल्याची माहिती समोर आली होती. तसेच, हे काढलेले डिझेल-पेट्रोल वर्धा येथील राजपाल यांच्या पेट्रोल पंपामधून भेसळ करून विक्री करण्यात येत असल्याचे आरोप आहेत. शहरातील अनेक नागरिकांची वाहने खराब झाल्याने या पेट्रोल पंपावरील विक्री घटली, त्यानंतर हेच इंधन सरकारी वाहनांमध्ये ओतले जात असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात सरकारी वाहनांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती पोलिस महासंचालक श्री. संदीप पाटील तसेच वर्धा पोलिस अधीक्षक श्री. सौरभ अग्रवाल यांना देण्यात आल्यानंतर तातडीने कारवाई करण्यात आली आणि संबंधित अवैध धंदे बंद करण्यात आले, असे चित्र सध्या दिसून येत आहे.

दरम्यान, नागपूर येथील घातक स्वरूपाचे तस्कर पुन्हा सक्रिय झाल्याची माहिती असून, ही गिरीश राजपाल याची संघटित गँग असल्याचा आरोप आहे. या टोळीत जिल्ह्यातील काही लोकांचा सहभाग असून, किमान 12 ते 15 जण या संघटित गुन्हेगारीत सामील असल्याचे सांगितले जाते. बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर राजपालकडून सातत्याने धमक्या दिल्या जात असल्या तरी, त्या धमक्यांना भीक न घालता या अवैध धंद्यांचा पर्दाफाश सुरूच असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष दिले असून, यापुढे ज्या भागात अशा प्रकारचे अवैध धंदे सुरू राहतील, त्या क्षेत्रातील संबंधित पोलिस कर्मचारी जबाबदार धरले जावेत, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!