Advertisement

जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांची प्रभावी पोलिसिंग वर्धा जिल्ह्यात शांततेची पुनर्स्थापना

समाचार शेयर करें

जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांची प्रभावी पोलिसिंग
वर्धा जिल्ह्यात शांततेची पुनर्स्थापना

वर्धा (मंगेश चोरे पाटील) 
वर्धा जिल्ह्यात पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीत लक्षणीय बदल दिसून येत असून, जिल्ह्यात शांतता प्रस्थापित झाल्याचे स्पष्ट चित्र सध्या दिसत आहे. नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. सौरभ अग्रवाल यांच्या शांत, संयमी व परिणामकारक पोलिसिंगमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस आणि जनतेमधील विस्कटलेला विश्वास पुन्हा दृढ होत असल्याचे जाणवते.

गांधी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्ध्यात दारूबंदीची अंमलबजावणी ही पोलीस विभागासाठी कायमच मोठी डोकेदुखी राहिली आहे. मात्र श्री. अग्रवाल यांनी कोणताही गाजावाजा न करता, शांततेत आणि कायदेशीर मार्गाने कारवाई करून यावर तोडगा काढण्याचा आदर्श ठेवला आहे.

मागील काळात वर्धा जिल्ह्यात पदाचा खुलेआम गैरवापर, भ्रष्टाचार, अधिकाऱ्यांची अमानवी वर्तणूक तसेच खोट्या गुन्ह्यांची नोंद यामुळे परिस्थिती गंभीर बनली होती. वर्धा कारागृहात कैद्यांना जागा उरली नव्हती, तर हजारो बनावट प्रकरणांमुळे न्यायालयांमध्येही प्रचंड गर्दी उसळली होती. सामान्य नागरिकांच्या मनात पोलिसांची भीती निर्माण झाली होती. किरकोळ गुन्ह्यांसाठीही मोठ्या पोलीस फौजा रवाना होत असल्याचे चित्र होते, ज्यामुळे जिल्ह्यात अराजकतेसारखी परिस्थिती निर्माण झाली होती.

मात्र नवीन पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली परिस्थितीत आमूलाग्र बदल झाला आहे. अनेक गंभीर व गुंतागुंतीच्या प्रकरणांचा कोणताही ताणतणाव न वाढवता शांततेत निपटारा करण्यात आला आहे. गुन्हेगारांवर कठोर कारवाई झाली असली, तरी कुठलाही दिखावा करण्यात आलेला नाही.

अलीकडेच सावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या बँक दरोड्याच्या प्रकरणात आरोपी तब्बल बारा दिवस पोलीस कोठडीत होते. अत्यंत शिताफीने तपास करून आरोपींना अटक करण्यात आली, मात्र यालाही कोणताही अनावश्यक गाजावाजा करण्यात आला नाही. ही बाब पोलीस यंत्रणेच्या व्यावसायिकतेचे उत्तम उदाहरण ठरते.

अशा अनेक घटनांमुळे सध्या वर्धा जिल्ह्यात शांतता, सुव्यवस्था आणि सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. सौरभ अग्रवाल यांच्या कार्यपद्धतीचे सर्वत्र कौतुक होत असून, नागरिकांमध्ये पुन्हा एकदा पोलीस प्रशासनाबद्दल विश्वास निर्माण होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!