जनतेवर अन्याय करण्याचा अधिकार पोलिसांना नाही – पोलिस अधीक्षक श्री. सौरभ अग्रवाल

वर्धा (प्रतिनिधी):
वर्धा नजीकच्या पांढरकवडा पारधी बेडा येथील एका उच्चशिक्षित तरुणावर खारांगणा पोलिस ठाण्यातील कर्मचारी मनीष श्रीवास व अमर करणे यांनी जाणीवपूर्वक मारहाण केल्याच्या गंभीर प्रकरणी मानवाधिकार संघटनेच्या वतीने विशेष पोलिस महानिरीक्षक श्री. संदीप पाटील यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.
मानवाधिकार संघ (I.H.R.A.) चे राज्य अध्यक्ष श्री. मंगेश चोरे (पाटील) यांच्यासह सह-राज्य सदस्य श्री. दिलीप भुजाडे व इतर पदाधिकाऱ्यांनी ही तक्रार सादर केली. यावेळी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष पोलिस महानिरीक्षक श्री. संदीप पाटील यांनी जनतेवर अत्याचार करणे, पैशाची मागणी करणे व मारहाण करणे हे अत्यंत चुकीचे असल्याचे स्पष्ट करत तीव्र नाराजी व्यक्त केली.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून तात्काळ कारवाई करण्याचे आदेश नवनियुक्त पोलिस अधीक्षक श्री. सौरभ अग्रवाल यांना देण्यात आले. त्या अनुषंगाने आज शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक श्री. सौरभ अग्रवाल यांची प्रत्यक्ष भेट घेतली.
पीडित तरुणाने पोलिसांनी केलेल्या फोन कॉलचे रेकॉर्डिंग सादर केले असून तो या प्रकरणातील महत्त्वाचा व सबळ पुरावा असल्याचे सांगण्यात आले. तसेच झालेल्या अत्याचाराची सविस्तर माहिती पोलिस अधीक्षकांना देण्यात आली.
हे प्रकरण अमानवीय स्वरूपाचे असून याची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलिस अधीक्षक श्री. सौरभ अग्रवाल यांनी दिले. यापुढे अशा प्रकारचा अन्याय सहन केला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. लवकरच या प्रकरणात ठोस कारवाई होण्याचे संकेत मिळाले आहेत.
दरम्यान, नवनियुक्त पोलिस अधीक्षक श्री. सौरभ अग्रवाल यांच्या नवीन कार्यकाळासाठी उपस्थित सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.














Leave a Reply