Advertisement

कारंजा एम.डी. प्रकरण : केमिकल लोच्या की तपासातील गोंधळ?

समाचार शेयर करें

कारंजा एम.डी. प्रकरण : केमिकल लोच्या की तपासातील गोंधळ?

दोनशे कोटींच्या दाव्यावर संशय, आरोपींना एमसीआर**

वर्धा (मंगेश चोरे पाटील)
आर्वी तालुक्यातील कारंजा येथे नार्कोटिक विभागाने करोडो रुपयांचा एम.डी. साठा पकडल्याचा दावा करत एक खळबळजनक प्रकरण उघड केले. हे प्रकरण अधिवेशनातही गाजले. मात्र एवढ्या गंभीर स्वरूपाच्या प्रकरणाला विरोधी पक्षाकडून अपेक्षित तेवढे महत्त्व का देण्यात आले नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे.नार्कोटिक विभागाकडून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत जवळपास दोनशे कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले. मात्र आश्चर्य म्हणजे, न्यायालयाने तिन्ही आरोपींना एमसीआर (मजिस्ट्रेट कस्टडी रिमांड) वरच रवाना केले. एवढ्या मोठ्या आर्थिक व अमली पदार्थ प्रकरणात वाढीव पीसीआर न मिळणे, हे अनेक शंका निर्माण करणारे ठरत आहे.

          विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण एम.डी. ड्रग्सपेक्षा ‘केमिकल लोच्या’ अधिक वाटत आहे. न्यायालयासमोर सुनावणीदरम्यान नार्कोटिक विभागाने ठामपणे जप्त पदार्थ एम.डी. असल्याचे स्पष्ट केले नाही. ज्या पदार्थापासून एम.डी. तयार होते, तो पदार्थ केवळ तीन किलो असून त्याची बाजारभावात किंमत अंदाजे दीड कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. मग दोनशे कोटींचा आकडा नेमका कसा ठरवण्यात आला, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेली अनेक केमिकल्स बाजारात सहज उपलब्ध असून त्यांची किंमत दहा ते पन्नास रुपये इतकीच आहे. असे असताना या केमिकल्सची किंमत लाखोंमध्ये दाखवली गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आकडे फुगवून दाखवण्यात आले का, अशी चर्चा सध्या जोर धरत आहे.

              नार्कोटिक विभागाने न्यायालयात ठोस भूमिका न मांडल्यामुळेच न्यायालयाने आरोपींना वाढीव पीसीआर न देता एमसीआर दिल्याचे बोलले जात आहे. या सगळ्या प्रकरणामुळे तपासाची दिशा आणि सत्यता यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

            दरम्यान, या प्रकरणाच्या निमित्ताने वर्धा पोलिसांची राजकीय पातळीवर बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही चित्र आहे. प्रत्यक्षात हा प्रकार स्थानिक पातळीवर कोणाच्याही लक्षात आला नव्हता. पोलिसांच्या निदर्शनास न आलेली ही बाब नार्कोटिक विभागाने उघडकीस आणली, हे वास्तव असताना देखील पोलिस यंत्रणेला लक्ष्य केले जात आहे.

माध्यमांसमोर अद्याप कोणते केमिकल, कोणते द्रावण, किती प्रमाणात जप्त झाले आणि त्यांची वास्तविक बाजार किंमत किती याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परिणामी जनतेत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

      आज जवळपास दोनशे कोटी रुपयांचा सांगितला जाणारा मुद्देमालाचा आकडा फुगवलेला असल्याची शंका बळावत चालली आहे. त्यामुळे नार्कोटिक विभागाने प्रेससमोर येऊन संपूर्ण तपशील कोणते केमिकल, किती प्रमाणात आणि त्याची नेमकी बाजार किंमत किती याचा खुलासा करावा, अशी जोरदार मागणी जनतेकडून होत आहे.

     या गुप्त तपासामुळे नाहक पोलिस यंत्रणा बदनाम होत असून, पोलिसांविरोधातील अपप्रचारामुळे वर्धा पोलिसांचे मनोबल खच्ची होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण पारदर्शकपणे जनतेसमोर आणावे, अशी मागणी विविध संघटनांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!