Advertisement

भावी नगराध्यक्ष म्हणून सुधीर पांगुळ यांच्या नावाची जोरदार चर्चा

समाचार शेयर करें

भावी नगराध्यक्ष म्हणून सुधीर पांगुळ यांच्या नावाची जोरदार चर्चा

वर्धा (प्रतिनिधी – मंगेश चोरे):
वर्धा नगरपरिषद निवडणुकीच्या घोषणा होताच शहरात सर्वत्र एकच चर्चा रंगू लागली आहे .भावी नगराध्यक्ष कोण?
जनतेकडून थेट निवड होणार असल्याने यावेळी जनतेचा कल कोणाकडे झुकतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या पार्श्वभूमीवर सुधीर पांगुळ या नावाची जोरदार चर्चा होत असून, ते काँग्रेस पक्षाकडून प्रमुख दावेदार ठरू शकतात, असे जाणकारांचे मत आहे. सध्याच्या राजकीय वातावरणाचा विचार करता, काँग्रेस पक्षासाठी परिस्थिती काहीशी पोषक असल्याचे दिसते.

दुसरीकडे, भारतीय जनता पक्षात लोकप्रिय चेहऱ्यांचा अभाव जाणवत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. नगरपरिषदेचे विद्यमान उपाध्यक्ष प्रदीप ठाकूर यांनी उमेदवारीसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, त्यांना पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास आणि त्यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरायचा निर्णय घेतल्यास निवडणुकीची समीकरणे पूर्णपणे बदलू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ठाकूर यांचा अनेक प्रभागांमधील प्रभाव आणि दीर्घ अनुभव हे त्यांच्या बाजूचे बलस्थान ठरणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो, अशी चर्चा रंगली आहे.

यावेळी दोन्ही शिवसेना गट, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट आणि अजित पवार गट), भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तसेच भाजप आणि काही अपक्ष दिग्गज उमेदवार अशा अनेक पक्षांचा सहभाग राहणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे मतांचे विभाजन मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.

सध्यातरी सुधीर पांगुळ यांच्या नावावरच चर्चेचे वारे जोरात वाहत आहेत. मात्र, इतर पक्षांचे उमेदवार रिंगणात आल्यानंतरच या निवडणुकीत कोण कुणाला भारी ठरणार, याचा खरा अंदाज येईल. जाणकारांच्या मते, भाजपचा उमेदवार कोण असेल आणि जाती-राजकीय समीकरणे कशी बसतात यावरच या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!