Advertisement

वर्ध्यात देहव्यापारावर पोलिसांचा छापा; एका पीडित महिलेची सुटका, दोन आरोपी अटकेत

समाचार शेयर करें

वर्ध्यात देहव्यापारावर पोलिसांचा छापा; एका पीडित महिलेची सुटका, दोन आरोपी अटकेत

वर्धा, दि. ५ जुलै : अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष आणि स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांच्या संयुक्त पथकाने कारला रोड परिसरात छापा टाकून सुरू असलेल्या देहव्यापाराच्या अड्ड्यावर कारवाई केली. या कारवाईत एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून, दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडून तीन अँड्रॉइड मोबाईल, रोख रक्कम आणि देहव्यापारासाठी वापरले जाणारे साहित्य असा एकूण ३४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ जुलै २०२६ रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार, कारला रोडवरील वैष्णवी कॉम्प्लेक्सजवळील नखाते लेआउट परिसरात राहणारी रूपा दुर्योधन गव्हाळे (वय ३३) ही स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी राज्यातील तसेच परराज्यातील महिलांना पैशांचे आमिष दाखवून देहव्यापारासाठी प्रवृत्त करत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. संबंधित महिलांना आपल्या राहत्या घरी बोलावून ग्राहकांना पुरविण्याचे काम सुरू असल्याचेही माहितीमध्ये नमूद करण्यात आले होते.

ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांनी पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांना कळविली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार अत्यंत गोपनीय पद्धतीने बनावट ग्राहक (पंटर) तयार करून सापळा रचण्यात आला.

पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने नखाते लेआउट परिसरातील संबंधित घरावर छापा टाकला. छाप्यादरम्यान रूपा दुर्योधन गव्हाळे आणि तिचा पती गणेश गोविंद महाले (वय ४३) हे दोघेही घरात आढळून आले. घराची झडती घेतली असता एका खोलीत बनावट ग्राहकासोबत एक महिला देहव्यापार करताना आढळली.

सुटका करण्यात आलेल्या पीडित महिलेची चौकशी केली असता ती नागपूर येथील रहिवासी असल्याचे समोर आले. रूपा गव्हाळे हिने पैशांचे आमिष दाखवून तिला वर्ध्यात बोलावून देहव्यापार करण्यास भाग पाडल्याची माहिती पीडित महिलेने पोलिसांना दिली. तसेच ग्राहकांकडून पैसे स्वीकारणे आणि घराबाहेरील हालचालींवर लक्ष ठेवण्याचे काम आरोपी गणेश महाले करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

कारवाईदरम्यान आरोपींकडून तीन अँड्रॉइड मोबाईल, ४ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम तसेच देहव्यापारासाठी वापरले जाणारे साहित्य असा एकूण ३४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात आरोपी रूपा दुर्योधन गव्हाळे आणि गणेश गोविंद महाले यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १४३(२) तसेच अनैतिक व्यापार (प्रतिबंधक) अधिनियम, १९५६ मधील कलम ३, ४, ५ आणि ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुटका करण्यात आलेल्या पीडित महिलेची महिला सुधारगृह, वर्धा येथे रवानगी करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक सिनुकुमार बानोत, विजयसिंह गोमलाडू तसेच पोलीस अंमलदार अमर लाखे, संजयसिंग सूर्यवंशी, चंद्रकांत बुरंगे, संजय राठोड, नितेश मेश्राम, अमोल नगराळे, मंगेश चावरे, नवनाथ मुंडे आणि अल्का कुंभलकर यांचा सहभाग होता.

दरम्यान, या कारवाईमुळे शहरातील अनैतिक व्यवसायांवर पोलिसांनी पुन्हा एकदा प्रभावी कारवाई केल्याचे स्पष्ट झाले असून, अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांविरोधात पुढील काळातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!