आर्वीत महिलांनी आमदाराला रस्त्यात अडवले
निवडणुकीत पाडल्याचा केला आरोप; पोलिसांच्या मध्यस्थीने वाद निवळला
वर्धा (मंगेश चोरे पाटील)
आर्वी येथील विधानपरिषदेचे आमदार दादाराव केचे हे नेहमीप्रमाणे रात्री दुचाकीवरून फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले असता, रस्त्यात काही महिलांनी त्यांना अडवले. या महिलांचा नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पराभव झाला असून, “आपण लोकांना तुतारी चिन्हाला मतदान करण्याचा सल्ला दिल्यामुळेच आम्ही पडल्याचा” आरोप त्यांनी आमदारांवर केला.
“आम्ही तुमच्यासाठी काय काय केले नाही? आणि तरीही तुम्ही आम्हालाच पाडले,” असे म्हणत महिलांनी जोरदार शब्दांत नाराजी व्यक्त केली. या वादामुळे परिसरात पाहता पाहता मोठी गर्दी जमली. परिस्थिती तापत असतानाच दादाराव केचे यांनाही संताप अनावर झाला. “मी तुला नोकरी दिली,” असे म्हणत त्यांनीही प्रत्यारोप सुरू केले, ज्यामुळे वाद अधिक चिघळला.
घटनेची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्यापर्यंत पोहोचताच पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप केला. सर्व संबंधितांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तेथे दोन्ही बाजूंना तक्रार देण्याबाबत विचारणा करण्यात आली. मात्र काही वेळातच वादाची तीव्रता कमी झाली आणि प्रकरणावर पडदा पडला.
अखेर सर्वजण शांतपणे घरी परतले. मात्र या घटनेमुळे आमदार दादाराव केचे यांची झोप उडाल्याची चर्चा आहे. आर्वीचे राजकारण म्हणजे नेहमीच तणावपूर्ण व गुंतागुंतीचे असल्याचे हे आणखी एक उदाहरण मानले जात आहे.





Leave a Reply