Advertisement

आज कराळे गुरुजींना जामीन… ‘अंदर’ गेले म्हणून गुरुजी शांत बसणार?…

समाचार शेयर करें

आज कराळे गुरुजींना जामीन… ‘अंदर’ गेले म्हणून गुरुजी शांत बसणार?…

वाचा आणि विचार करा लेख-मंगेश चोरे (पाटील) 

                कधी कधी एखाद्या माणसाला गप्प करण्यासाठी त्याच्यावर आरोप केले जातात, गुन्हे दाखल होतात, अटक होते आणि कारागृहाची दारे त्याच्यासाठी उघडली जातात. पण प्रश्न असा आहे की, माणसाला कारागृहात डांबता येते; विचारांना कसे डांबणार? आवाजाला कुलूप कसे लावणार? वर्धा येथील कराळे गुरुजी, ज्यांना परिसरात ‘मास्तर’ म्हणून ओळखले जाते, त्यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला. अटक झाली. न्यायालयीन प्रक्रियेतून त्यांना कारागृहात जावे लागले. तब्बल पाच दिवसांनंतर त्यांना जामीन मिळाला.आता प्रश्न आहे या पाच दिवसांत नेमके साध्य काय झाले? गुरुजींची नोकरी गेली का? त्यांचे शेत उजाडले का? त्यांच्या शेतातील सोयाबीन उपटून नेले का? की त्यांच्या आवाजाला कायमचे मौन आले? नाही! उलट, कारागृहातून बाहेर पडताना माणूस पूर्वीपेक्षा अधिक कठोर होऊन बाहेर येतो. कारण ज्याची भीती दाखवून त्याला गप्प करण्याचा प्रयत्न केला जातो, तीच भीती एकदा अनुभवून झाली की पुढे भीती उरत नाही.

                  कारागृह माणसाला तोडतेच असे नाही; कधी कधी ते त्याला स्वतःशी बोलायला शिकवते. गर्दीत जे विचार करता येत नाहीत, ते एकांतात करता येतात. आयुष्याचा हिशेब करता येतो. कोण आपले, कोण परके, कोण सोबत उभे राहिले आणि कोण दूर गेले—हे समजते.म्हणूनच प्रश्न असा आहे की, कराळे मास्तर आता गप्प बसतील का? माझ्या मते, कदाचित उलटच होईल.कारण ज्याने एकदा कारागृहाची दारे पाहिली, त्याला पुढच्या वेळी त्याच दारांची भीती राहात नाही. चुकीच्या गोष्टींना विरोध करणे हा गुन्हा आहे का? हा प्रश्न फक्त कराळे मास्तरांचा नाही. हा प्रश्न समाजातील प्रत्येक जागरूक नागरिकाचा आहे.

              चुकीच्या गोष्टींना विरोध केला म्हणून एखाद्याला गुन्ह्यांची भीती दाखवली गेली, तर उद्या सामान्य माणूस आवाज उठवणार कसा?आज एकाला गप्प केले, उद्या दुसरा स्वतःच गप्प बसेल. परवा तिसरा अन्याय पाहूनही डोळे झाकेल.आणि मग समाजात अन्याय करणारे धाडसी आणि अन्याय सहन करणारे असंख्य अशी परिस्थिती निर्माण होईल.लोकशाहीची खरी ताकद निवडणुकीत नसते; ती प्रश्न विचारण्याच्या नागरिकाच्या धैर्यात असते. पोलीस आणि जनता यांच्यातील अंतर वाढू नये पोलीस हा समाजाचा शत्रू नाही. पोलीस हा समाजाच्या सुरक्षेसाठी असतो. त्यामुळे पोलिसांवर राजकीय किंवा इतर कोणताही दबाव येऊ नये, हीच लोकशाहीची अपेक्षा आहे.

            एखाद्या व्यक्तीवर कारवाई करायची असेल तर ती कायद्याच्या चौकटीत, पुराव्यांच्या आधारे आणि निष्पक्षपणे झाली पाहिजे.कारण आज जर एखाद्या व्यक्तीला वाटले की त्याच्यावर कारवाई कायद्यामुळे नव्हे, तर दबावामुळे होत आहे, तर त्याचा विश्वास केवळ एका अधिकाऱ्यावरून उठत नाही—तो संपूर्ण व्यवस्थेवरून उठतो.

आणि व्यवस्थेवरील विश्वास तुटणे ही कोणत्याही समाजासाठी धोक्याची घंटा आहे. मास्तरांना ‘अंदर’ पाठवून काय मिळाले? समजा, त्यांना पकडण्यासाठी पोलिसांचा वेळ गेला. वाहन गेले. इंधन गेले. मनुष्यबळ गेले. शेवटी त्यांना कारागृहात पाठविले गेले आणि पाच दिवसांनी न्यायालयाने जामीन मंजूर केला.मग जनतेच्या पैशातून गेलेला वेळ, इंधन आणि मनुष्यबळ याचे काय?हा पैसा कुणाचा?आपला. तुमचा-आमचा.कायद्याची अंमलबजावणी आवश्यकच आहे. परंतु प्रत्येक कारवाईचा अंतिम उद्देश काय असावा? न्याय की केवळ दबाव? हा प्रश्न विचारणेही गरजेचे आहे. कारागृहाची भीती दाखवून आवाज थांबतो का? काळ बदलला आहे.एकेकाळी ‘जेल’ हा शब्द ऐकला तरी सामान्य माणूस हादरायचा. आज परिस्थिती वेगळी आहे. सार्वजनिक जीवनातील अनेक मोठ्या व्यक्तींनी कारागृह पाहिले आहे. काहींनी कारागृहातून बाहेर येऊन पुन्हा सार्वजनिक जीवनात मोठी उंची गाठली आहे.मग एखाद्या सामान्य व्यक्तीला कारागृह दाखवून त्याचा आवाज कायमचा बंद होईल, अशी अपेक्षा कशी करता येईल?शरीराला चार भिंतींमध्ये ठेवता येते; पण विचारांना नाही. मास्तर मोठे कोणी केले? आजवर अनेकांनी कराळे मास्तरांकडे दुर्लक्ष केले असेल.पण आज त्यांच्या अटकेची चर्चा होते आहे. जामिनाची चर्चा होते आहे. त्यांच्या भूमिकेवर चर्चा होते आहे.म्हणजेच, ज्यांना दुर्लक्षित करायचे होते, त्यांनाच या सगळ्या घटनांनी अधिक चर्चेत आणले.कधी कधी एखाद्याला संपवण्याच्या प्रयत्नात त्याला अधिक मोठे केले जाते.आज मास्तर ‘मास्तर’ आहेत; उद्या ते ‘हेडमास्तर’ झाले तर त्याला जबाबदार कोण? ज्यांनी त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, तेच कदाचित त्यांच्या आवाजाला अधिक मोठा व्यासपीठ देऊन गेले असतील.राजकारण गढूळ होत आहे की समाजातील द्वेष वाढत आहे?आज गुन्हेगारीपेक्षा एक गोष्ट अधिक वेगाने वाढताना दिसते—द्वेष.मतभेद असू शकतात. विचार वेगळे असू शकतात. राजकीय भूमिका वेगवेगळ्या असू शकतात.पण मतभेदांचे रूपांतर वैयक्तिक वैरात झाले, तर लोकशाही कमकुवत होते.विरोधकाला संपवण्यापेक्षा त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याची ताकद राजकारणात असली पाहिजे.कारण प्रश्न विचारणारा माणूस शत्रू नसतो; तो लोकशाहीचा आरसा असतो.आणि शेवटी…कराळे मास्तर दोषी आहेत की निर्दोष, हे न्यायालय ठरवेल. कायद्याचा अंतिम निर्णय न्यायालयाचाच असतो.पण एक सामाजिक प्रश्न विचारण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे ……वाचा विचार करा…एखाद्याला कारागृहात पाठवून त्याचा आवाज बंद करता येतो का? एखाद्याला घाबरवून समाजातील प्रश्न संपतात का? आणि एखाद्याला दाबण्याच्या प्रयत्नातून तोच माणूस अधिक ताकदीने उभा राहिला, तर त्याला जबाबदार कोण?कराळे मास्तर ‘अंदर’ गेले म्हणून त्यांची प्रतिष्ठा संपली असे नाही.कदाचित ते बाहेर आले तेव्हा त्यांच्यासोबत एक नवा अनुभव, नवी जिद्द आणि नव्या प्रश्नांची शिदोरीही बाहेर आली असेल.म्हणूनच शेवटचा प्रश्न पुन्हा एकदा—“मास्तर गप्प बसणारे व्यक्ती आहेत का?”याचे उत्तर काळच देईल.पण एक गोष्ट मात्र निश्चित आवाज दाबला की प्रतिध्वनी अधिक दूरवर ऐकू येतो.

वाचा… विचार करा… आणि मग ठरवा—प्रश्न विचारणारा माणूस आपला शत्रू आहे की समाजासाठी आवश्यक असलेला आरसा?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!