वर्धा–नागपूर महामार्गावर ‘पेट्रोल बॉम्ब’चा धोका!
केळझरजवळ दहेगाव पुल परिसरात भीषण दुर्घटनेची भीती – प्रशासन झोपेत.

वर्धा (मंगेश चोरे पाटील)
वर्धा–नागपूर या अत्यंत व्यस्त महामार्गावर प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. केळझर गावाजवळील दहेगाव पुल परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर इंधन काढण्याच्या प्रकारामुळे कोणत्याही क्षणी भीषण स्फोट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून भरदिवसा रस्त्यावर टँकर उभे करून खुलेआम डिझेल-पेट्रोल काढले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे, काही ठिकाणी रस्त्यावरच इंधन सांडून “ज्वलनशील प्रवाह” तयार झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, हे काढलेले इंधन परिसरातील वादग्रस्त व्यक्ती रवी चोरे यांच्या धाब्यावर तसेच शेत परिसरात साठवले जात आहे. यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, अनेकांनी पुलाखालच्या मार्गाने जाणे टाळण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, या अवैध प्रकाराकडे पोलिस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. सेलू पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
विशेष म्हणजे, याआधी देखील अशाच प्रकारात गुन्हे शाखेने गिरीश राजपाल यांच्याशी संबंधित वाहन रंगेहात पकडले होते. त्या कारवाईनंतर काही काळ हा धंदा बंद झाला होता. मात्र, आता पुन्हा तोच प्रकार उघडपणे सुरू झाल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.














Leave a Reply