वर्धा १४ कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप; कार्यकारी अभियंत्याविरुद्ध कारवाईची मागणी
वर्धा (प्रतिनिधी) – वर्धा येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता एकनाथ तिखिले यांच्यावर सुमारे १४ कोटी रुपयांच्या सरकारी निधीच्या गैरव्यवहाराचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
माहितीनुसार, तिखिले यांनी नागपूर येथील डी.पी. जैन अँड कंपनीसोबत संगनमत करून प्रत्यक्ष काम न करता कोट्यवधी रुपयांचे बिल अदा केल्याचा आरोप आहे. कामाची प्रत्यक्ष पाहणी न करता, साइटवर न जाता कार्यालयातूनच देयके मंजूर करण्यात आल्याचेही समोर आले आहे.
ही बाब आतापर्यंत गुप्त ठेवण्यात आली होती. मात्र, मानवाधिकार संघटनेचे राज्याध्यक्ष मंगेश चोरे (पाटील) यांच्याकडे संबंधित कागदोपत्री पुरावे सादर करण्यात आले आहेत. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तसेच, हे प्रकरण लवकरच राज्याचे मुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित किंवा बडतर्फ करण्याची मागणी संघटनेकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, या आरोपांमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रशासनाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.













Leave a Reply