
वर्धा (मंगेश चोरे पाटील):
वर्धा शहरातील महिला आश्रम परिसरातील राजपाल पेट्रोल पंपाचा मालक गिरीश राजपाल याच्यावर पुन्हा एकदा डिझेल-पेट्रोल तस्करीचे गंभीर आरोप होत आहेत. यापूर्वीही चोरीचे डिझेल घेताना तो पकडला गेला होता. त्या वेळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली होती. मात्र, या प्रकरणात महामार्गावरील टँकरमधून डिझेल-पेट्रोल चोरणारे मुख्य तस्कर अजूनही मोकाट असल्याने पुन्हा एकदा हा अवैध धंदा सुरू झाल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केळझर परिसरातून वर्ध्याकडे डिझेल-पेट्रोलची अवैध वाहतूक सुरू असून यासाठी MH 46/3280 आणि MH 43/5873 या क्रमांकांची वाहने वापरली जात असल्याचा आरोप आहे. ही वाहने महिला आश्रम परिसरातील राजपाल यांच्या पंपावर इंधन पोहोचवत असल्याचेही बोलले जात आहे.
या प्रकरणात स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिस ठाण्याच्या हद्दीतही हप्तेखोरीमुळे तस्करीला मोकळे रान मिळत असल्याचा आरोप केला जात आहे.तर सेलूचे ठाणेदार साहेबांनी आम्हाला परवानगी दिली असल्याचे तस्कर खुलेआम सांगत आहे.त्यामुळे आता पुढे मोठा विषय पुढे उभा राहणार असे संकेत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, केळझर येथील दहेगाव पुलाखाली टँकरमधून खुलेआम डिझेल-पेट्रोल काढले जाते. तसेच एका बंद धाब्यावरही अवैध साठा आणि तस्करीचा प्रकार सुरू असल्याचे सांगितले जाते. मात्र, या सर्व प्रकारांकडे सेलू पोलिस दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, तस्करांकडूनच “आम्हाला धंदा चालविण्याची परवानगी आहे” अशा प्रकारचे दावे केले जात असल्याची चर्चा आहे. एवढेच नव्हे तर, काही जण गुन्हे शाखेच्याही नावाचा उल्लेख करत फंड दिला जात असल्याचे उघडपणे सांगत असल्याने प्रशासन आणि पोलीस यंत्रणेची प्रतिमा मलिन होत असल्याचे बोलले जात आहे.
यापूर्वी पकडण्यात आलेल्या वाहनानंतर आता नव्या क्रमांकांच्या गाड्यांमधून इंधनाची वाहतूक सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून तातडीने कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.














Leave a Reply