वर्धा वाहतूक पोलिसांनी जखमी चालकाचे प्राण वाचविले; तातडीने रुग्णालयात दाखल करून दिले जीवदान
वर्धा.(प्रतिनिधी)
आज दुपारी सुमारे 5.00 वाजता पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांच्या आदेशानुसार वर्धा वाहतूक पोलीस सेलू–सेवाग्राम–पवणार परिसरात मोटार वाहन कायद्यान्वये कारवाईसाठी पेट्रोलिंग करीत होते. यावेळी पवणार पुलावर एक दुचाकी चालक गाडी स्लिप होऊन पडल्याचे गर्दीवरून निदर्शनास आले.
तत्काळ घटनास्थळी पोहोचून पोलीस निरीक्षक विलास पाटील, पोलीस हवालदार किशोर पाटील व चालक स्वप्नील तंबाखे यांनी रस्त्यावर पडलेल्या जखमी इसमास सुरक्षित ठिकाणी हलविले. त्यांची दुचाकी (क्र. MH 27 BS 1502) देखील बाजूला करण्यात आली. त्वरित रुग्णवाहिका बोलावून जखमी व्यक्ती राजेंद्र कुबळे (वय 50 वर्षे, रा. सुरगाव, जि. वर्धा) यांना सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
वेळीच प्रथमोपचार व वैद्यकीय मदत मिळाल्याने जखमीचा रक्तस्त्राव कमी होऊन त्याचे प्राण वाचले. जखमीचे भाऊ विजय रंगराव कुबळे (रा. सुरगाव) यांना घटनास्थळी बोलावून दुचाकी, मोबाईल व इतर साहित्य त्यांच्या ताब्यात देण्यात आले.
वाहतूक पोलिसांनी केलेल्या तात्काळ मदतीमुळे जखमीच्या भावाने वर्धा वाहतूक पोलिसांचे मनापासून आभार मानले. यावेळी वाहतूक पोलिसांनी नागरिकांना दुचाकी सावधगिरीने चालवावी, हेल्मेटचा वापर करावा व अपघातमुक्त प्रवास करावा, असे आवाहन केले आहे.















Leave a Reply