नागपूरच्या डिझेल तस्कराकडून जीवे मारण्याची धमकी
डिझेल तस्करीचा पर्दाफाश केल्याने धमक्या वाढल्या पत्रकारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न
वर्धा (मंगेश चोरे पाटील):
डिझेल-पेट्रोल तस्करीचा पर्दाफाश केल्यानंतर संबंधित अवैध धंदे बंद पडल्याने तस्करांकडून थेट जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
नागपूर येथील रहिवासी व कथित डिझेल तस्कर दिल्लदार याने फोनवरून बातमी प्रकाशित केल्यास घरावर पेट्रोल टाकून आग लावण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित धमकीचे फोन रेकॉर्डिंग सुरक्षित ठेवण्यात आले असून, या धमकीमागे वर्धा येथील गिरीश राजपाल याचा सहभाग असल्याचेही बोलले जात आहे.
आरोपानुसार, सावंगी परिसरात राजरोसपणे डिझेल-पेट्रोलचे अनेक अवैध धंदे सुरू असून, यामध्ये टँकर चालक व काही सहकारी सहभागी आहेत. सावंगी-पुलगाव मार्गावर उभारलेल्या एका मोठ्या हॉटेल परिसरात दररोज लाखो रुपयांचा इंधनाचा काळाबाजार होत असल्याचा दावा करण्यात येत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, “आम्ही पोलिसांना दरमहा लाख रुपये देतो” असे वक्तव्य दिलदार व त्याचे सहकारी करत असल्याचा आरोपही समोर आला आहे. मात्र या प्रकारामुळे पोलिस दलाची बदनामी होत असून, हे आरोप गंभीर तपासाची मागणी करणारे आहेत.
या संपूर्ण प्रकरणाची माहिती वर्धा जिल्हा पोलिस अधीक्षकांना देण्यात आली आहे. संबंधित तस्करी कायमची बंद होईपर्यंत या प्रकरणावर सातत्याने बातम्या प्रकाशित केल्या जातील, अशी भूमिका पत्रकारांनी घेतली आहे.
“पत्रकारिता ही घाबरून किंवा दबावाखाली केली जाणारी गोष्ट नाही. धमक्यांना भीक न घालता सत्य मांडले जाईल,” असेही ठामपणे नमूद करण्यात आले आहे.
क्रमशः… पुढील घडामोडी लवकरच















Leave a Reply